आनंद बक्षीचे साधेच पण अत्यंत समर्पक शब्द, L. P. च्या संगीताचा सुंदर ठेका आणि रेश्माचा हटके आवाज याचं जादुई मिश्रण "लंबी जुदाई" या गाण्यात आहे. गाण्याची सुरवातच रेश्मा आपला टिपेचा सूर लावून करते.
बिछडे अभी तो हम बस कल परसो..., जिउंगी मै कैसे इस हाल मे बरसो.....हे शब्द रेश्माच्या वरच्या सुरात कानावर पडले की हमखास माझ्या छातीत धडधडायला लागतं. जिउंगी मै कैसे मधला "कैसे" रेश्मा असा काही आळवते की त्या शब्दांमधली हतबलता, व्याकुळता थेट काळजाशी जाऊन भिडते. ही गुणी गायिका राजस्थानच्या बिकानेर इथे एका भटक्या बंजारा कुटुंबात जन्मली. फाळणी नंतर तिचं कुटुंब पाकिस्तानात स्थायिक झालं. रेश्माच्या सुंदर आवाजावर शास्त्रीय संगीताचे संस्कार होऊ शकले नाहीत. पारंपारिक लोकसंगीताचा ठसा मात्र तिच्या आवाजात पुरेपूर जाणवतो. हे लंबी जुदाई गाणं इतकं लोकप्रिय झालं की तिची "दमा दम मस्त कलंदर" आणि तत्सम सिंधी पंजाबी गाणी पण आवडीनं ऐकली गेली.
तारुण्याचे नव्हाळीचे दिवस, मनात नुकतीच उमलणारी प्रेम भावना यामध्ये डुंबत असतानाच जालीम दुनिया जेव्हा प्रेमात अडथळे निर्माण करते तेव्हा कधी कधी प्रचंड वैफल्य येतं. नैराश्यामध्ये सोडलेला एक उसासा हजार शब्दात सांगता न करता येणारी भावना व्यक्त करतो.
मौत ना आई तेरी याद क्यो आई... हाय.... लंबी जुदाईया ओळीमधला "हाय" एखादाच सेकंद रेंगाळतो पण त्या क्षणार्धात तो आपलं काम अगदी चोख बजावतो. सारंगीच्या ताणलेल्या तारांवरती गज फिरवून आर्त आवाज निघावा तशी रेश्मा गातच असते. "बाग उजड गये......" लगेचच सूर बदलून हेच शब्द हताशपणे आळवले जातात
बाग उजड गये खिलने से पहले....पंछी बिछाड गये मिलने से पहले...हिरो पिक्चर मी पाहिलेला नाही. त्याची गाणी youtube वर सहज उपलब्ध असतानापण मला त्याचं चित्रीकरण बघायची अजिबात इच्छा नाही. Earphone कानाला लावून डोळे मिटले की एका विरहिणीचा आर्त आक्रोश मूर्तिमंत समोर उभा रहातो. तसं बघायला गेलं तर कुठल्याही तद्दन फिल्मी गाण्यासारखंच हे एक गाणं, पण माझ्या मते निव्वळ रेश्माच्या आवाजामुळे मला हे गाणं इतकं भावतं
याच गाण्यात पुढे Hero ची theme म्हणून ओळखली जाणारी बासरी वाजते. ही बासरी अजूनही कधी कधी मोबाईल ची रिंग टोन म्हणून ऐकायला येते. त्या रिंग टोनचा मालक बऱ्याचदा चाळीस पन्नाशीतला प्रौढ असतो. मला हटकून वाटतं की नक्कीच याच्या तरुणपणीच्या काही हळव्या आठवणी या गाण्याशी गुंतल्या असाव्यात .